

संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरात गुरुवारी (17 जुलै 2025) सायंकाळी जिल्हा न्यायालयाच्या शिपायाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण शंकर वेडे (वय 33, रा. साळीवाडा, रंगारगल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118 (1), 115, 352, 3(5) नुसार गुन्हा क्र. 655/2025 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीच्या मोटरसायकलला कट मारून धडक दिली आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने शिवीगाळ न करण्यास सांगितल्यावर, आरोपीने त्यांच्या तोंडात हाताने चापटी मारली. तसेच, डोळ्यावर आणि छातीवर हाताने बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीने विरोध केल्यावर, आरोपीने कमरेतून एक लोखंडी वस्तू काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली.
या घटनेनंतर, रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. गुन्ह्यात हॉकी स्टिकचा वापर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी प्रवीण वेडे हे जिल्हा न्यायालय, संगमनेर येथे शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी येथे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लुमा भांगरे करत आहेत.






