

महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त
अहिल्यानगर:
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक तुषार छबूराव धाकराव, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब रावसाहेब फोलाणे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची ऑनलाईन लाच घेतल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तपास करत आहे.
या प्रकरणातील फिर्यादीने ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी, शिर्डी’ येथे ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, कंपनीचे लोक पैसे घेऊन पसार झाले. यासंदर्भात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा याचा तपास करत आहे. तपासादरम्यान, आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी) याच्याकडे गुंतवणुकीबाबत चौकशी केली असता, त्याने शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकलो नाही, असे सांगितले.
सावळेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२५ रोजी तो आणि त्याचे दोन भाऊ तसेच काही मित्र फॉर्च्युनर गाडीतून नाशिकला जात असताना राहाता तालुक्यातील लोणीजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. कोणतीही आरबीआय परवाना नसताना जनतेकडून पैसे गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
यावर सावळेने कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी विषय ताणत सुटकेसाठी १ कोटी ५० लाख रुपये रोख स्वरूपात देण्याची मागणी केली. सावळेने रोख रक्कम नसल्याचे सांगितल्यावर, पोलीस उपनिरीक्षक धाकराव आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये आणले. तेथे उपनिरीक्षक धाकराव यांनी सावळेला ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर करण्याची मागणी केली. खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा, सावळेने पोलिसांना त्यांनी दिलेल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले.
सात महिन्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आले असून, सखोल चौकशीत पीएसआय तुषार धाकराव आणि त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी हे गैरकृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे २१ जुलै २०२५ रोजी पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, काही पोलीस अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीने पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी ही माहिती दिली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाच्या
सावळेने दिलेल्या माहितीनुसार,

