
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
शासनाकडून भरमसाट पगार मिळत असतानाही, अतिरिक्त कमाईच्या हव्यासापोटी लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांसह एका मजुराला यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा मार्गावरील बागवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी (२४ जुलै २०२५) ही कारवाई करण्यात आली. मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा असताना, मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोने (२६), पवन तानसेन भितकर (३०) आणि नीलेश भास्कर तलवारे (३०) यांनी कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडे मुरूम वाहतुकीच्या सर्व कायदेशीर पावत्या असतानाही, या कर्मचाऱ्यांनी २१ जुलै रोजी १७ हजार रुपये रोख घेऊन ट्रॅक्टर जप्त केला होता. उर्वरित २३ हजार रुपये देण्यासाठी ते वारंवार मागणी करत होते.

या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, उर्वरित २३ हजार रुपयांपैकी ७,५०० रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आरोपी तयार झाले. खासगी व्यक्ती असलेल्या अशोक श्रावण रणखांब (६०) या मजुराने बागवाडी बसथांब्याजवळ ही रक्कम स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून सर्व आरोपींना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्जुन धनवट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.



