

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यात कुरण येथे अवैधपणे सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून ४० हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे संगमनेरमधील कत्तलखाने बंद असल्याचा दावा फोल ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संगमनेर तालुक्यातील कुरण येथील नादिर शेख याच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोवंश प्राण्यांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक छापा टाकला. त्यावेळी, पोलिसांनी घटनास्थळी ३ ते ४ इसम गोवंश प्राण्यांची कत्तल करताना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे ४० हजार रुपये किमतीचे कत्तल केलेले गोमांस आणि १५ हजार रुपये किमतीची दुचाकी आढळली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले असून, एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नादिर शेखसह चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसापासून संगमनेर मध्ये अवैध कत्तलखाने बंद असल्याचे सांगितले जात असले तरी संगमनेर तालुक्यात मात्र अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे त्यामुळे कत्तलखाने बंद असल्याचा कत्तलखाना चालक आणि पोलिसांचा दावा फोल ठरत आहे.





