

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन
संगमनेर, प्रतिनिधी: घुलेवाडी (संगमनेर) येथील रहिवासी राजू मनोहर थोरात यांनी १५ ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ट्रक चालकाने घरात झोपेत असताना कुटुंबाला चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या घटनेत थोरात यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले होते.
त्यानंतर थोरात यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे वारंवार मदतीची मागणी करूनही अद्याप कोणतीही चौकशी न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला कंटाळून थोरात यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासन यापासून काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे.
राजू मनोहर थोरात, (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे १.२६ वाजता त्यांच्या घरात ट्रक क्र. (MH-17-CV-1110) घुसला होता. या अपघातात घराच्या नुकसानीसह घरात झोपलेले कुटुंबीय गंभीर जखमी झाले. या अपघातातील केवळ नशीब बलवत्तर म्हणून कुटुंबीय वाचले होते. या घटनेनंतर थोरात यांनी प्रशासनाकडे चौकशी व मदत करण्याची मागणी केली. मात्र, सहा महिने उलटूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
थोरात यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, घटनेनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला राहण्याची गैरसोय झाली आहे. आजपर्यंत त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रश्न कोणतीही कार्यवाही होत नसल्याने व न्याय मिळत नसल्याने त्यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी संगमनेरला प्रांताधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनाही पत्र पाठवून त्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.



राजू मनोहर थोरात,
मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी,