संगमनेर / अकोले –
अकोले तालुक्यात ‘हनीट्रॅप’चा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सापळा रचून एका आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले आहे.
या हनीट्रॅपमध्ये अनेक जण अडकले असल्याची शक्यता असून, संबंधित महिलांनी अनेक पुरुषांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली आहे. यामुळे काही जण कर्जबाजारी झाल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या टोळीने खंडणीसाठी अल्पवयीन मुलींचाही वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पीडित व्यक्तीने अकोले पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याची ओळख संगमनेर येथील कविता विधाते हिच्याशी झाली. ओळखीनंतर त्यांच्यात फोनवरून बोलणे सुरू झाले. काही दिवसांनी कविताने त्याला अकोले येथे तिची मैत्रीण छाया धुमाळ हिचा नंबर दिला. त्यानंतर, छायाने त्याला ‘तुम्ही अकोले येथे या, आम्ही तुम्हाला प्रेमासाठी महिला पुरवतो,’ असे सांगून एका व्यक्तीचा नंबर दिला.
त्यानंतर एका खडी क्रशरजवळ पीडित व्यक्तीचा व्हिडिओ काढून त्याला व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने पीडित व्यक्तीने वेळोवेळी पैसे दिले. मात्र, पैशाची मागणी थांबत नसल्याने आणि होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने 29 ऑगस्ट रोजी अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांचा सापळा- माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी आलेल्या प्राजक्ता रावसाहेब मुंगसे या महिलेला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांनी आतापर्यंत पीडित व्यक्तीकडून 84 हजार रुपये रोख आणि फोन-पे द्वारे घेतले होते. तर पुन्हा 6 हजार रुपये घेत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या महिलांनी त्याला धमकावून आणि मारहाण करून खंडणी उकळली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी प्राजक्ता रावसाहेब मुंगसे, कविता विशाल विधाते आणि छाया संजय धुमाळ या तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा- अशा प्रकारे ज्या पुरुषांची फसवणूक झाली असेल, त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.
तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल, संगमनेरमधील व्यक्ती हनीट्रॅपच्या जाळ्यात
अशा प्रकारे ज्या पुरुषांची फसवणूक झाली असेल, त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.



संगमनेर / अकोले – 
पोलिसांचा सापळा-
