संगमनेर –
संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी शहर पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. अटक केलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (२७, रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला संगमनेर न्यायालयाने मंगळवारी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर आरोपीला चिथावणी दिल्याच्या कारणावरून भास्कर लहानु खेमनर यांना सहआरोपी करण्यात आले आहे.
खताळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ७९८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०९ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात भास्कर लहानू खेमनर (रा. संगमनेर) याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यांनी अटक केलेल्या आरोपीला गुन्हा करण्यास चिथावणी दिल्याने त्यांना सह-आरोपी करण्यात आले आहे. खेमनर हे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक आहेत.
तपासामध्ये आतापर्यंत आरोपी प्रसाद गुंजाळ आणि आमदार खताळ पाटील यांच्यात कोणतेही आर्थिक हितसंबंध किंवा देवाणघेवाण आढळून आलेली नाही.
सध्याच्या पुराव्यांवरून भारतीय न्याय संहिता कलम ४९ नुसार कलमांची वाढ करण्यात आली आहे.
- याप्रकरणी तपास सुरू असल्याने तपासावर परिणाम होईल अशा अफवा सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांवर पसरवू नयेत, तसेच आक्षेपार्ह वक्तव्य किंवा संदेश प्रसारित करू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी नागरिकांना दिला आहे.
- दरम्यान याप्रकरणी आरोपीच्या आईने पोलीस ठाण्यात आमदार खताळ यांच्यासह काही जणांविरोधात तक्रार अर्ज दिला आहे मात्र या संदर्भात पोलीस प्रशासनाने कोणता निर्णय घेतला याबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.





संगमनेर – 
सध्याच्या पुराव्यांवरून भारतीय न्याय संहिता