

संगमनेर: काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये नशेचे इंजेक्शन्स (ड्रग्स) विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता शहरातील ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अकोले नाका परिसरातील एका संकुलातील ‘कॅफे’वर छापा टाकून ही गंभीर बाब समोर आणली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अकोले नाका परिसरातील संकुलातील कॅफेमध्ये मुला-मुलींना अश्लील कृत्यांसाठी जागा दिली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि त्यांच्या पथकाने शनिवारी (दि. ०८) दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई केली.
कारवाईदरम्यान, पोलिसांनी कॅफेमध्ये तपासणी केली असता, काही मुले-मुली आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. पोलिसांनी एका युवकाकडे व्यवसायाच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने जागा भाड्याने घेतली असून, कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
या प्रकरणात परवान्याचा गंभीर गैरवापर झाला असल्याचे स्पष्ट झाले. जागेच्या मालकाने संगमनेर नगरपरिषदेकडून सदर जागेसाठी ‘मोबाइल शॉपी व मोबाइल दुरुस्ती’चा कायदेशीर व्यवसाय करण्याचा परवाना घेतला होता. मात्र, मूळ परवाना मोबाइल शॉपीचा असताना, कॅफे अनधिकृतपणे सुरू असल्याचे या कारवाईत उघड झाले.
याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅफेचा चालक सोपान एकनाथ पवार (वय २४, रा. कोठे मळा, संगमनेर) व जागेचा मालक योगेश सुरेश वारुंगसे (वय ४५, रा. स्वातंत्र्य चौक, संगमनेर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील अशा प्रकारच्या अनधिकृत आणि अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॅफे’ संस्कृतीवर पोलिसांची धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील बारवकर यांनी म्हटले आहे.



या प्रकरणात परवान्याचा गंभीर गैरवापर झाला असल्याचे स्पष्ट झाले.
