महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
लाच घेणाऱ्यांवर न्यायालयात कारवाई करण्याची जबाबदारी असताना, त्याच सहायक सरकारी वकिलाने लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लाच प्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर, त्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकील शरद बन्सी बांगर (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराची एका लाच प्रकरणात १९ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्दोष मुक्तता झाली होती. या निकालाला शासनातर्फे उच्च न्यायालयात आव्हान न देण्यासाठी वकील बांगर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराने यापूर्वीच बांगर यांना १ लाख ५० हजार रुपये दिले होते आणि उर्वरित ५० हजार रुपयांसाठी बांगर वारंवार तगादा लावत होते.
तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) धाव घेतली. एसीबीच्या पडताळणीत बांगर यांनी तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. १७ नोव्हेंबर रोजी एसीबीने सापळा लावला, परंतु बांगर यांना संशय आला आणि त्यांनी एका वकिलामार्फत ‘एसीबीचा संशय आहे’ असा निरोप पाठवला. १८ नोव्हेंबरलाही त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. तरीही, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, शासनातर्फे स्वतः पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर यांनी फिर्याद देत सहायक सरकारी वकील शरद बांगर यांच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (एसीबी, छत्रपती संभाजीनगर) माधुरी केदार-कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर, पोलीस निरीक्षक कोमल शिंदे, अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गजानन कांबळे, मनोहर भुतेकर, शिवलिंग खुळे आणि अमोल चेके यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सरकारी वकील ACB च्या जाळ्यात: उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी मागितली २ लाखाची लाच!
या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: 
तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) धाव घेतली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक
