संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहर पोलिसांनी वेल्हाळे शिवारात मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या कारवाईत ८ जिवंत बैलांची सुटका करण्यात आली असून, टेम्पोसह एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
मंगळवारी, (दि. १६ डिसेंबर) रात्री १०:५० च्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वेल्हाळे शिवारातून एका आयशर टेम्पोमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अनाधिकृत वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, राहुल पांडे आणि विजय आगलावे यांच्या पथकाने रात्री ११:१० वाजेच्या सुमारास वेल्हाळे येथील हरीबाबा मंदिरासमोर सापळा रचला.
सापळ्या दरम्यान नाशिकच्या दिशेने जाणारा संशयित आयशर टेम्पो (क्र. MH-26-BE-3247) संशयास्पदरीत्या उभा असलेला पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत निर्दयीपणे, अन्न-पाण्याशिवाय कत्तलीच्या उद्देशाने ८ बैल कोंडलेले आढळले. यामध्ये ४ काळ्या रंगाचे, ३ तांबड्या रंगाचे आणि १ पांढरा-काळा पट्टा असलेला अशा एकूण ८ बैलांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि १ लाख ६० हजार रुपये किमतीची ८ जनावरे, असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कत्तलीच्या उद्देशाने जनावरे नेले जात असल्याचे समोर आले असून ही जनावरे नेमकी कोठे नेली जात होती आणि कोठून नेले जात होते याचा तपास लावण्याचे आव्हान पोलीस अधिकाऱ्यांसमोर असेल. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना पुढील संगोपनासाठी वेल्हाळे येथील ‘जिवदया गोरक्षण संस्था पांजरपोळ’ येथे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी चालक टेम्पो सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशरवरील अज्ञात चालकाविरुद्ध ‘प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमा’तील कलम ३ आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अशोक पारधी करत आहेत.







