

अहिल्यानगर: सोशल मीडियाचा वापर करून एका १८ वर्षीय तरुणीची बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून, तिचे फोटो आणि गावातील एका तरुणाचे छायाचित्र मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील एका १८ वर्षीय तरुणीच्या नावाने काही अज्ञात व्यक्तींनी इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार केले होते. या खात्यावर पीडितेचे मूळ फोटो वापरून त्यासोबत चुकीची माहिती जोडण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणासोबत तिचे फोटो तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पद्धतीने तयार केले आणि ते सार्वजनिकरीत्या प्रसारित केले.
या कृत्यामुळे समाजात आपली विनाकारण बदनामी होऊन मानहानी झाल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मोबाईल क्रमांक आणि संबंधित इंस्टाग्राम खात्याच्या माहितीवरून तपासाला सुरुवात केली आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशा प्रकारे कोणाचेही बनावट खाते तयार करून बदनामी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






या कृत्यामुळे समाजात आपली विनाकारण बदनामी