पुणे-
पुणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावली होती, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील एक मोठे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुरेश कलमाडी यांनी पुण्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी पुण्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी मोठे निर्णय घेतले. पुण्याचा कायापालट करणाऱ्या अनेक उड्डाणपुलांच्या कामात आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली, तसेच पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा संकुले उभारण्यात त्यांचा पुढाकार होता.
सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी ‘पुणे महोत्सव’ या माध्यमातून शहराला एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या एरंडवणे येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आणि असा मोठा परिवार आहे.








