
संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. म्हाळुंगी नदीवर वेल्हाळे गावठाण ते राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता, गणपती मळ्याजवळ जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या कामामुळे घुलेवाडी आणि धांदरफळ गटातील वेल्हाळे, राजापूर, निमगाव भोजापूर, गुंजाळवाडी आणि चिकणी या पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या पुलामुळे परिसरातील शेतकरी, शाळकरी मुले आणि ग्रामस्थांची होणारी मोठी गैरसोय दूर होणार असून, लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.
शासनस्तरावरून तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांना निधी मिळवून देण्याचा संकल्प असल्याचे सांगत, आमदार खताळ यांनी या महत्वपूर्ण मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.





