

अहिल्यानगर-
कोपरगाव शहर परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पथकाने कोपरगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये पोलीस अंमलदार दीपक मेढे, राहुल द्वारके, राहुल डोके, सतिश भवर, सुनिल मालणकर आणि चालक भगवान धुळे यांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे मनोज चंद्रकांत गिरमे हा आपल्या साथीदारांसह घरगुती गॅस सिलिंडरमधून चारचाकी वाहनांमध्ये अवैधपणे गॅस भरत होता. या माहितीची खातरजमा करून पथकाने स्थानिक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मनोज चंद्रकांत गिरमे (वय ४५), सिद्धार्थ संदीप गिरमे (वय २६, दोन्ही रा. निवारा हौसिंग सोसायटी, कोपरगाव), मुज्जमिल जाकिर मन्यार (वय २२), सद्दाम जाकिर मन्यार (वय २५, दोन्ही रा. चांदवड, जि. नाशिक) आणि फहिम हरुन शेख (वय ३०, रा. कोपरगाव) या पाच आरोपींना अटक केली आहे. हा व्यवसाय मनोज गिरमे याच्या मालकीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एचपी कंपनीचे २२ हजार रुपये किमतीचे ८ गॅस सिलिंडर (५ भरलेले व ३ रिकामे), १५ हजार रुपयांची गॅस रिफिलिंगची इलेक्ट्रिक मोटार व पाईप, ५ हजार रुपयांचा वजन काटा आणि २ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. आरोपींनी शासनाचा कोणताही परवाना न घेता आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा ज्वलनशील पदार्थांचा व्यापार मांडला होता, यामुळे सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोपरगाव पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






