संगमनेर तालुक्यातील खळी येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबाने दुसऱ्याच्या उभ्या मका पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किशोर दादू वाघमारे (रा. खळी) यांचे त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्यांशी शेतीच्या वाटणीवरून गेल्या काही काळापासून न्यायालयात वाद सुरू आहेत. ९ जानेवारी २०२६ रोजी किशोर वाघमारे हे त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी लोणी येथील रुग्णालयात गेले होते. हीच संधी साधून आरोपींनी मुंबईहून थेट खळी येथे येत शेत गट क्र. १५ व १६ मध्ये ट्रॅक्टर चालवून उभ्या मका पिकाची नांगरणी केली.
पिकाचे नुकसान होत असल्याचे पाहून फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी आरोपी महेश वाघमारे याने कमरेला कट्टा लावून “तू मुंबईला दिसलास तर तुला कायमचा संपवून टाकू” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करून साहित्याचे नुकसान केले.
याप्रकरणी आश्वी पोलिसांनी अविनाश रामदास वाघमारे, महेश रामदास वाघमारे, सुमन रामदास वाघमारे व ज्योत्स्ना राजेंद्र जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.