संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात प्रवाशांना गाठून लुटण्याची घटना घडली असून, एका शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचे समोर आले आहे. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही लूटमार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव देपा (ता. संगमनेर) येथील शेतकरी नितीन बाळासाहेब फटांगरे (वय ४६) हे १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास नाशिक ते पुणे महामार्गावरून जात असताना ही घटना घडली. चंदनापुरी घाटातील खिंडीच्या वळणाजवळ पाठीमागून विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉन मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम आले. या इसमांनी फटांगरे यांच्या मोटारसायकलला आपली गाडी आडवी लावून “तुम्ही आमच्या गाडीला कट मारला आहे” असे म्हणत त्यांना थांबवले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण करून चाकूचा धाक दाखवला आणि फटांगरे यांच्या खिशातील २०,००० रुपये रोख व १०,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३०,००० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

