संगमनेर, प्रतिनिधी –
“नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे. आता या संघर्षासाठी ‘अभी नही, तो कभी नही’ अशी वेळ आली आहे,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष – नाशिक-पुणे रेल्वेच्या थेट मार्गासाठी गेल्या काही काळापासून जनआंदोलन उभे राहिले आहे. या प्रश्नी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बैठक घेण्याचे कबूल केले असले, तरी अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीची प्रतीक्षा आता संपूर्ण विभागाला लागून राहिली आहे.
पोस्टकार्ड मोहिमेतून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार – या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एक अभिनव पाऊल उचलले आहे. संगमनेर तालुक्यातील शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण आता थेट मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड लिहून आपल्या भावना कळवणार आहेत. जेव्हा हजारो पत्रे मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचतील, तेव्हा या विषयाची तीव्रता शासनाच्या लक्षात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मोहिमेत पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लढा आता रस्त्यावर आणि सभागृहातही – नाशिक-पुणे रेल्वेचा संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. आमदार तांबे म्हणाले की, आम्ही केवळ विनंत्या करून थांबणार नाही. जर गरज पडली तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. ऑनलाइन पद्धतीने जनजागृती करण्यासोबतच सभागृहात आणि सभागृहाबाहेरही हा लढा अधिक तीव्र केला जाईल.
थेट मार्गाऐवजी इतर पर्यायांचा विचार केल्यास या भागातील जनतेवर अन्याय होईल, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या आंदोलनामुळे नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









संगमनेर, प्रतिनिधी –