
अहिल्यानगर –
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव आणि खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व अमोल कोतकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पहिली कारवाई २० जानेवारी २०२६ रोजी मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर गावच्या शिवारात करण्यात आली. नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने तिथे छापा टाकला. यावेळी दोन जेसीबीच्या साहाय्याने तीन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असताना पोलिसांनी संदिप अशोक जाधव (रा. खडकत, जि. बीड), नितीन केरबा कापरे (रा. नागलवाडी, ता. कर्जत) आणि अलम निजामुद्दीन शेख (रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. नागलवाडी) या तिघांना ताब्यात घेतले. याच ठिकाणाहून चालक अजय खेडकर व ऋषिकेश खेडकर (रा. सांगवी, जि. बीड) हे पळून जाण्यात यशस्वी झाले.
चौकशीत सदर जेसीबी हे संभाजी बाबुराव बांदल व धनंजय बांदल (रा. नागलवाडी, ता. कर्जत) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत ५० लाखांचे दोन जेसीबी, २४ लाखांचे तीन ट्रॅक्टर आणि ३० हजार रुपयांची ३ ब्रास वाळू असा एकूण ७४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. खर्डा ते भूम रोडवर वाळूने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने खर्डा बस स्टँडसमोर सापळा रचून ट्रॅक्टर पकडला. यावेळी चालक योगेश अण्णा सुरवासे (रा. खर्डा, ता. जामखेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८ लाखांचा ट्रॅक्टर व १० हजारांची १ ब्रास वाळू असा ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही प्रकरणांत मिरजगाव आणि खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही मोठी कारवाई असून, यापुढेही अवैध धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारे कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.



