संगमनेर, प्रतिनिधी –
भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या पायी दिंडीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसरात मुक्कामी असलेल्या दिंडीच्या पालखीतील ३६० ग्रॅम चांदीच्या पादुका आणि एक मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
घारगाव येथील ‘साई सह्याद्री तरुण मित्र मंडळाची’ पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे शिर्डीकडे प्रस्थान करत असताना २९ जानेवारी रोजी चंदनापुरी येथे मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास चोरट्याने संधी साधून पालखीतील चांदीच्या पादुका चोरल्या. त्याचवेळी मंदिरात झोपलेल्या एका भाविकाचा मोबाईलही लंपास करण्यात आला.
सखाराम कुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही अद्याप पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. यामुळे ग्रामस्थ आणि साई भक्तांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बन्सी टोपले पुढील तपास करत आहेत.






