संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३९,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब दादा आव्हाड (वय ६३ वर्ष, रा. निळवंडे, ता. संगमनेर) हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त बाहेर गेले होते. दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरात ठेवलेल्या बॅगेतून २३,००० रुपये रोख रक्कम आणि १६,५०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम २३० मिली वजनाचे सोन्याचे मणी, शिंपले जोड व काळ्या मण्यांची पोत असा एकूण ३९,५०० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेला.
नातेवाईकाच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून घरी परतल्यानंतर आणि खात्री केल्यानंतर फिर्यादीने आज संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी याप्रकरणी बी.एन.एस (BNS) कलम ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३/२०२६ नुसार दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






