अहिल्यानगर:
जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यास सुरुवात झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी बदलीचे पहिले आदेश निर्गमित केले आहेत.
या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होत्या, त्याला आता खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाला आहे.
आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची साईमंदिर सुरक्षा कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली झाली असून, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडे आता सोनई पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलात झालेल्या या बदलांमुळे इतर अधिकाऱ्यांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः ज्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीबाबत तक्रारी आहेत किंवा ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा अधिकाऱ्यांना इतर पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षात पाठवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी अनेक अधिकारी आता सतर्क झाले असून काहींनी आपली बदली रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांसोबतच कामगिरीत ‘ढ’ ठरलेल्या अधिकाऱ्यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. रिक्त होणाऱ्या जागांवर वर्णी लावण्यासाठी इतर विभागातील अनेक अधिकारी इच्छुक असून अंतिम निर्णय आस्थापना मंडळाचा असणार आहे. लवकरच बदल्यांचा दुसरा टप्पा जाहीर होणार असल्याने पोलीस दलात सध्या कमालीची उत्सुकता आणि धाकधूक पाहायला मिळत आहे.




