संगमनेर, प्रतिनिधी –
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण शक्यता निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याची पूर्वतयारी ठेवावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत.
तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात विशेष नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने सायखिंडी आणि पठार भागातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या भागातील अनेक वाड्या-वस्त्यांना अद्याप शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध झालेला नाही, तर काही ठिकाणी योजनाच पोहोचलेल्या नाहीत.
आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना खडसावताना सांगितले की, कागदोपत्री योजना पूर्ण दाखवून प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नसेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. मागील वर्षी तालुक्यात २१ टँकर सुरू होते, मात्र यंदा जलजीवनच्या अपूर्ण कामांमुळे ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या भागात पाणीटंचाई जाणवेल, तिथे कोणत्याही प्रशासकीय दिरंगाईविना तातडीने पाहणी करून टँकर मंजूर करावेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणे हे प्रशासनाचे अपयश ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
टंचाईच्या काळात तालुक्यातील कोणत्याही गावाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी तंबी यावेळी देण्यात आली. पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी तातडीने दूर करून टँकरचे प्रस्ताव विनाविलंब सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पाणी मिळणे हा नागरिकांचा हक्क असून तो कोणत्याही परिस्थितीत अबाधित राखला जावा, यासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही आमदार खताळ यांनी यावेळी दिला.







