संगमनेर, प्रतिनिधी –
लोकशाहीमध्ये ग्रामसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे एका तरुणाला मूलभूत पाणी प्रश्नावर आवाज उठवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून बाजार समितीच्या संचालकाने तरुणाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
धांदरफळ खुर्द येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना पियुष ठोंबरे या तरुणाने, आमच्या घरी नळाचे पाणी का येत नाही? असा साधा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे प्रश्न का विचारतो? तुला पाहून घेईन, अशी धमकी देत पियुषला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या अनपेक्षित प्रकारामुळे ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला. उपस्थित ग्रामस्थांनी तातडीने मध्यस्थी करून वाद मिटवला, मात्र या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एका लोकप्रतिनिधीने सामान्य नागरिकाच्या प्रश्नावर अशा प्रकारे हिंसक प्रतिक्रिया देणे, हे लोकशाहीला घातक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
पियुष ठोंबरे याने याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत बाजार समिती संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.





