संगमनेर, प्रतिनिधी-
राज्यभरात सध्या घरगुती गॅसचा संभाव्य तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी होताना दिसत असून, यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने पुढाकार घेत राज्य शासनाकडे विशेष उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गॅस वितरणातील विस्कळीतपणा आणि एजन्सीबाहेर उसळणारी गर्दी यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, संतापलेल्या जनतेमुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते, याकडे त्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
आमदार तांबे यांच्या विनंतीची तातडीने दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कामाला लावले आहे. त्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तातडीने दूरध्वनीवरून संपर्क साधून कडक सूचना दिल्या आहेत. गॅस वितरण सुरळीत राहील याची काळजी घेण्याचे तसेच एजन्सीच्या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त आणि गर्दीचे नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.https://x.com/i/status/2031956453721071696
तांबे यांच्या या तत्परतेमुळे गॅस वितरणातील अडथळे दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांची तातडीची पावले; पालकमंत्री विखे-पाटील यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला कडक सूचना
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तातडीने दूरध्वनीवरून संपर्क साधून कडक सूचना दिल्या आहेत.





