अहिल्यानगर, प्रतिनिधी –
पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सावेडी उपनगरातील अशोकनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी रवींद्र नारायण राजहंस हे सावेडी येथील जॉगिंग पार्कजवळ थांबलेले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून दिली. त्यांनी एका पत्त्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने राजहंस यांचा विश्वास संपादन केला आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे दागिने व पैसे पिशवीत ठेवण्यास सांगितले. या बहाण्याने आरोपींनी त्यांच्याकडील सोन्याच्या आणि तांब्याच्या अंगठ्या हातचलाखीने लंपास केल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवली. तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सज्जाद गरीब शहा इराणी याने केल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. आरोपी भिंगार येथील गोविंदपुरा नाका परिसरात येणार असल्याची टीप मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून सज्जाद इराणी (वय ४७, रा. श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला चुलत भाऊ मुस्लीम यासीन इराणी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता, या टोळीने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारची लूट केल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे आंतरजिल्हा सक्रिय असलेल्या टोळीला चाप बसला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या यशस्वी कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, भीमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सुनिल मालणकर, भगवान थोरात, सतिष भवर, चालक उत्तरेश्वर मोराळे आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.
पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एलसीबीने बेड्या ठोकल्या, संगमनेरमध्येही केली लूट
या टोळीने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारची लूट केल्याचे समोर आले आहे.





