अहिल्यानगर:
अहिल्यानगर येथील तहसील कार्यालयात आपली ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत मंजूर झालेले ३० हजार रुपये मिळवून देण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या प्रकरणाची माहिती मिळताच तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने सापळा रचला आणि बाबासाहेब राऊत याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली असून, शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सामान्यांना अशा प्रकारे आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी. अशा प्रकरणांत तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





