नाशिक:
अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे. आता खरात विरोधात सातवा गुन्हा दाखल झाला असून, एका पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत.
पीडित तरुणी आणि तिचे कुटुंब शेतात घर बांधण्याबाबत विचारणा करण्यासाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी २०२१ मध्ये अशोक खरातला भेटले होते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार तिने सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
तक्रारीनुसार, खरातने शैक्षणिक सल्ला देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या आई-वडिलांना केबिनबाहेर काढले. त्यानंतर, तांब्याच्या पेल्यात मंत्रोच्चार केलेले पाणी पिण्यास देऊन तरुणीला बेशुद्ध केले किंवा तिचे मानसिक नियंत्रण मिळवले.
स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगून त्याने मी सांगेल तसे कर, अन्यथा तुझ्या वडिलांना मारून टाकीन आणि कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करेन, अशी धमकी देऊन तरुणीचे लैंगिक शोषण केले. ऑफिस बॉय नीरज जाधव यांच्याबरोबर तक्रार देणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून आता खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्याचे पाय आणखी खोलात गेले आहेत.
सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असून, अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





