संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिकच्या सिन्नर येथील स्वयंघोषित कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असतानाच आता त्याचे धक्कादायक संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. खरातने केवळ नाशिक वा इतर जिल्ह्यातच नव्हे, तर संगमनेरसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात खरातच्या मुलीच्या नावावर मोठी प्रॉपर्टी असल्याचे समोर येत आहे. या मालमत्तेमुळे आता तपासाची व्याप्ती वाढली असून, खरातच्या काळ्या साम्राज्याचा आणखी एक पदर उलगडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणावर सविस्तर निवेदन देताना खरातच्या कुंडलीतील सर्व काळेबेरे चव्हाट्यावर आणले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने केवळ नावाचाच नव्हे तर आपल्या ओळखीचाही मोठा खेळ मांडला होता. त्याचे मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात असे असून, दहावी नापास असतानाही त्याने अंकशास्त्राच्या नावाखाली मोठी माया जमवली. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर राजकारणी, बडे अधिकारी आणि सेलिब्रिटींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या भोंदूची संपत्ती काही कोटींच्या घरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेरमधील मालमत्तेसोबतच खरातची व्याप्ती प्रचंड असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, मिरगाव येथे ३३ एकर, पाथर्डी गावात १० एकर, नाशिक-सिन्नरमध्ये १० एकर, राहता येथे साडेचार एकर, काकडी ता. शिर्डी विमानतळ परिसरात ५.५ एकर, तर सिन्नरमध्ये पाच जणांच्या नावावर सहा एकर जमीन आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे पाथर्डी फाटा येथे फ्लॅट, ओझर येथे प्लॉट, पनवेलमध्ये ४० गुंठे प्लॉट आणि नाशिकच्या कॅनडा कोर्ट परिसरात ऑफिस आहे. विशेष म्हणजे खरातने आपल्या मुलीच्या नावावर संगमनेरात प्लॉट आणि पुण्यातही मालमत्ता खरेदी केली आहे. याशिवाय नाशिकमधील कर्मयोगी नगर येथे बंगला, शिर्डीतील साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय, १२ तोळे सोने, पत्नीच्या नावावर २० तोळे सोने आणि बँक खात्यांमध्ये मोठी गुंतवणूक त्याच्याकडे असल्याचे समोर आले आहे.
या सर्व गैरप्रकारांच्या तपासासाठी आता एसआयटीने कंबर कसली आहे. खरातचे इगतपुरीतील एका भोंदूबाबाशी असलेले कनेक्शनही तपासाच्या केंद्रस्थानी आहे. नांदगाव बुद्रुक येथील या भोंदूबाबाकडूनच त्याला काळी जादू करण्यासाठी लागणारे साहित्य, अंगठ्या आणि गंडे-दोरे पुरवले जात असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. या वस्तूंना तंत्रमंत्राची जोड देऊन खरात अनेक महिलांना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करत असे. आता संगमनेरमधील येथील मालमत्तेच्या चौकशीनंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. खरातच्या या साम्राज्यवादी फसवणुकीच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, पीडित महिला व नागरिक आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.





