संगमनेर, प्रतिनिधी-
सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य दामोदर मालुंजकर याची संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये १६ एप्रिल २०२० रोजी दुपारी चारच्या सुमारास अकोले तालुक्यातील खानापूर शिवार परिसरात बारा वर्षांची अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या आजी आणि फिर्यादीसोबत शेतात चारा आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने त्यांना हटकले आणि लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून दमदाटी केली.
पीडित मुलीच्या आजी आणि फिर्यादीने मुलीला घरी पाठवले, मात्र आरोपीने तिला वाटेत गाठले. तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवून तो मुलीला मोटारसायकलवर बसवून एका निर्जन ठिकाणी ऊसाच्या शेतात घेऊन गेला. तिथे आरोपीने मुलीशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत १७ एप्रिल २०२० रोजी अजिंक्य दामोदर मालुंजकर (रा. उंच खडक खुर्द, ता. अकोले) याच्याविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३६६, ३५४, १८८ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. गेली सहा वर्षे हा खटला संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. मात्र, आरोपीचे वकील ॲड. निखिल वाकचौरे यांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेऊन आरोपीचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः, या प्रकरणात अकोल्याच्या तहसीलदारांसमोर झालेली ओळख परेड कायदेशीर नियमांचे पालन करून झालेली नाही, ही महत्त्वाची बाबदेखील त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी काल, (२ एप्रिल) आरोपी अजिंक्य दामोदर मालुंजकर याची आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपीच्या वतीने मुख्य वकील म्हणून ॲड. निखिल वाकचौरे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. महेश जेजुरकर आणि ॲड. कावेरी जाधव यांनी सहकार्य केले.






