महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर मधील सोनांबेकर रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांवर रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने हॉस्पिटलने ओपन स्पेस मध्ये केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांच्याकडे केल्यानंतर पालिका प्रशासनाने लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी धडक कारवाई केली.
कारवाईदरम्यान ओपन स्पेसमध्ये हॉस्पिटल प्रशासनाने टाकलेली भिंत आणि एका खोलीचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या पथकाने काढून टाकले आहे. सकाळी केलेल्या या कारवाईमुळे आता धन दांडग्यांच्या अतिक्रमणावर पालिकेचा जेसीबी पडला आहे. त्यामुळे सरकारी जागा बळकवण्याचा रुग्णालय प्रशासनाचा इरादा ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीनंतर प्रशासनाने हाणून पाडला आहे.
गेल्या महिन्याच्या अखेरीस सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट दोघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. दोन्ही डॉक्टर बड्या हस्तीशी संबंधित असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच तब्बल आठ दिवसानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे डॉ. सोनांबेकर यांनी सर्व्हे नंबर १११/३७ मधील ओपन स्पेस आणि रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरित हटवून दंडात्मक कारवाई करावी व ती जागा स्थानिक नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी, अशी मागणी केली होती. पालिकेने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर गुरुवारी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानंतर पालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे महेश गोरडे, अल्ताफ शेख, ओंकार सहाने, वैष्णवी गडाख ज्योती आव्हाड जयराम मंडलिक राजू मस्के आदींच्या पथकाने घटनास्थळी जात सोनांबेकर हॉस्पिटल प्रशासनाने मागील बाजूला टाकलेले कंपाउंडची भिंत आणि एका खोलीचे केलेले बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. पालिकेच्या या कारवाईचे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.






