महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, ११ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम लेखक आणि पत्रकार पी. साईनाथ हे ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर १२ एप्रिल रोजी तरुण पिढीतील लोकप्रिय वक्ते डॉ. स्वप्नील चौधरी यांचा ‘चल दंगल समजून घेऊ’ हा संवेदनशील विषयावरील विशेष कार्यक्रम होईल. १३ एप्रिल रोजी वारकरी संप्रदायातील प्रभावी प्रवचनकार ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज हे ‘समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावर पुष्प गुंफणार आहेत.
व्याख्यानमालेचा समारोप १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित ‘संघम् शरणम् गच्छामि’ या महानाट्याने होईल. अभ्युदय कला अकादमी, हैदराबाद यांच्या दाक्षिणात्य कलाकारांमार्फत हे महानाट्य सादर केले जाणार आहे.
दररोज सायंकाळी ६:३० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमांना अकोले तालुक्यातील सर्व सामाजिक व शिक्षक संघटना, शिक्षण संस्था आणि मान्यवर मंडळींचे सहकार्य लाभले आहे. या ज्ञानयज्ञात परिसरातील नागरिकांनी आपल्या परिवारासह आणि मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.






