महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय हा जात-धर्म आणि भेदापलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र गुंफण्याचे कार्य करतो, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर खुर्द येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला थोर संतांची परंपरा लाभली असून, संत ज्ञानेश्वरांनी रचलेले ‘पसायदान’ हे केवळ काव्य नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेले महाकाव्य आहे. सध्याच्या जागतिक युद्धाच्या आणि अशांततेच्या वातावरणात जगाला पसायदानाचा विचारच तारू शकतो.
ज्ञानेश्वर माउलींनी स्वतःच्या आयुष्यात मोठा संघर्ष सोसूनही जगाच्या सुखासाठी साकडे घातले. वारकरी संप्रदायात संत तुकाराम, संत चोखोबा, संत नामदेव, संत गोरा कुंभार अशा अठरापगड जाती-धर्मातील संतांनी समतेचा आणि मानवतेचा विचार मांडला आहे.
या संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची बुवाबाजी, अंधश्रद्धा किंवा भेदाभेदाला थारा नाही. संत चोखामळा आणि संत सोयराबाई यांनी रचलेले अभंग आजही मानवतेचा गौरव करतात. हाच समतेचा विचार आपल्याला भविष्यातही जपायचा असून सर्वांना सोबत घेऊन प्रगती साधायची असल्याचे थोरात यांनी नमूद केले.
यावेळी ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, सर्वांना सामावून घेण्याचा वारकरी विचार थोरात यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यातून संगमनेर तालुक्यात रुजवला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आर. एम. कातोरे, एस. पी. गोडसे, गणेश शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वारकरी संप्रदाय सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, सर्वांना सामावून घेण्याचा वारकरी विचार थोरात यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यातून संगमनेर तालुक्यात रुजवला आहे






