महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’मार्फत आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत संगमनेरचे चित्रकार आनंद गायकवाड यांनी यश संपादन केले आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर त्यांनी रेखाटलेल्या चित्राची देशभरातील ७५ उत्कृष्ट कलाकृतींमध्ये निवड करण्यात आली आहे.
प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे ललित कला अकादमीच्या सभागृहात आयोजित एका विशेष सोहळ्यात आनंद गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते गायकवाड यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि निवडक ७५ चित्रांचा समावेश असलेले विशेष ‘कॉफीटेबल बुक’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी ‘टर्न व्हिजन इनटू आर्ट : डिझाइन द पोस्टर, सेलिब्रेट द डिकेड’ ही संकल्पना ठेवण्यात आली होती. यामध्ये मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या विविध राष्ट्रीय विषयांवर देशभरातून ३,००० हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या विशाल स्पर्धेतून ७५ सर्वोत्तम कलाकारांची निवड करण्याची जबाबदारी पद्मश्री अच्युत पालव, वासुदेव कामत, सुधारक ओलवे, प्रसून जोशी, रवी जाधव आणि भारत दाभोळकर यांसारख्या दिग्गज परीक्षकांनी पार पाडली.
या प्रसंगी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम देशाच्या सर्जनशील शक्तीला राष्ट्रदृष्टीशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हे केवळ एक कॉफी टेबल बुक नसून प्रत्येक पान फ्रेम करण्यायोग्य असलेले एक ‘आर्ट बुक’ आहे, ज्याद्वारे ही कला घराघरांत पोहोचणार आहे.
या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही गौरवौद्गार काढले असून, कला आणि राष्ट्रभक्तीचा संगम घडवून आणणारा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. आनंद गायकवाड यांच्या या यशामुळे संगमनेरच्या कलाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.






