महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
साकुर पठार भागातील विविध गावांसह साकुर ते बिरेवाडी आणि रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात, ऑक्टोबर २०२४ पूर्वीच मंजूर झालेला आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी यासाठी एक रुपयाचाही निधी आणलेला नसून, त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम बंद करावे, अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी केली आहे.
बिरेवाडी येथे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रस्ते कामांच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर शेटे बोलत होत्या. डिग्रस ते रणखांबवाडी हे काम बाळासाहेब थोरात यांच्या २५-१५ निधीअंतर्गत मंजूर झाले होते. तसेच साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी या रस्त्यांच्या कामांसाठी आपण स्वतः थोरातांच्या मार्गदर्शनाखाली, यशोधन कार्यालय आणि इंद्रजीत थोरात यांच्या मदतीने मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला होता, याचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन लोकप्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत असले तरी त्यांनी तालुक्यासाठी कोणताही नवीन निधी आणलेला नाही. उलट, थोरातांच्या कार्यकाळात मंजूर झालेली अनेक विकासकामे त्यांनी रद्द केली आहेत. नवीन लोकप्रतिनिधी स्वतः काही करू शकत नसल्याने तालुक्यावर बाह्य शक्तींचे आक्रमण सुरू आहे. पठार भागातील ज्यांचे विकासकामात कोणतेही योगदान नाही, अशा लोकांना सोबत घेऊन भूमिपूजनाचा घाट घालणे अत्यंत चुकीचे आहे. नवीन सत्ताधारी काम न करता केवळ प्रसिद्धी मिळवणे आणि फ्लेक्स लावण्यात मग्न आहेत. त्यांनी स्वतः नवीन निधी आणून खुशाल उद्घाटने करावीत, मात्र जुन्या कामांचे श्रेय लाटणे बंद करावे, असे आवाहनही शेटे यांनी केले आहे.






