संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुकेवाडी येथील आग्नेश्वर मळा येथे घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भानुदास शिंदे (वय ५३) यांच्या बंद घराची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील ४ लाख ४० हजार रुपयांचा साडेतीन तोळ्यांचा राणीहार, १ लाख २० हजार रुपयांचा १ तोळ्याचा नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या, १ तोळ्याची आणखी एक सोन्याची साखळी, अर्धा तोळ्याचे कानातील जोड, सोन्याचे ओम पान, कानातील बाळी, नाकातील नथ, मोरणी आणि चांदीचे जोडवे व छल्ला असा एकूण ९,००,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय घरातील २,००० रुपये रोख रक्कम असा मिळून एकूण ९ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला आहे.
या प्रकरणी विठ्ठल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बी.एन.एस. कलम ३३०(२) व ३३१(३) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक ढोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.