कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिराच्या विकासकामात वनविभागाच्या हद्दीमुळे येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
श्रावणातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून आमदार खताळ यांनी आपल्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह मंदिरात जाऊन महापूजा, अभिषेक व आरती केली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मंदिराच्या नव्या वास्तूच्या निर्मितीची ग्वाही दिली.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिर परिसर वनजमिनीच्या हद्दीत येत असल्याने आवश्यक कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी शासन आणि मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मंदिराची जुनी वास्तू लक्षात घेता ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट आणि भाविकांच्या सहमतीने जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील वर्षी श्रावण महिन्यापर्यंत नव्या मंदिराचे काम पूर्ण करून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याचा आमचा मानस आहे, असे सांगतानाच धार्मिक महत्त्व आणि निसर्गसौंदर्य जपत परिसराचा विकास केला जाईल, असे सांगितले. याप्रसंगी सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशिद, डॉ. संदीप जोंधळे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.