गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या आठवड्यात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने सर्वत्र गणेश मंडळांच्या तयारीला जोरदार वेग आला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारपेठेत मागितलेली वर्गणी दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली असून समाजमाध्यमांवरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बातमी लिहीपर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. तक्रार दाखल नसल्यामुळे नेमकी कोणाला मारहाण झाली आणि मारहाण करणारे कोण होते, याबाबतची अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. तरीही या घटनेमुळे ऐन सणाच्या काळात वर्गणीच्या जबरदस्तीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह शहरात वाढत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करावी आणि व्यापाऱ्यांना सुरक्षिततेचे आश्वासन द्यावे, अशी जोरदार मागणी आता नागरिक व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.