श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना वाहने तोडून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांना अटक केली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, संशयित भंगार दुकानांमधून २१ हून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ व विशेष मोहीम राबवून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. श्रीरामपूर शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री आणि तोडफोड (Scrap) केली जात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्या पार्श्वभूमीवर शहरातील भंगार दुकानांची बारकाईने झडती घेण्यात आली. या तपासणीदरम्यान शकील इब्राहिम शहा (वय ४९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर), सुलेमान दादामिया शहा (वय ४५, रा. संजयनगर, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) आणि आसिफ हारुण शहा (वय ४०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, वॉर्ड नं. २) यांच्या गोपीनाथनगर येथील भंगार दुकानांमधून मारुती अल्टो, स्विफ्ट, टाटा मॅजिक, टाटा सँट्रो, इंडिका, वॅगनर, ओमिनी व पोलो यांसारख्या अनेक गाड्या आणि मोटरसायकल आढळल्या.
पोलीस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्याच्या आधारे न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन या वाहनांच्या कागदपत्रांची आणि रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आसिफ हारुण शहा याने समाधानकारक माहिती दिली, मात्र शकील इब्राहिम शहा आणि सुलेमान दादामिया शहा हे दोघेही आपल्या ताब्यातील वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा पुरावे सादर करू शकले नाहीत.
तपासात ही वाहने चोरीची असून प्रादेशिक परिवहन विभागाची (RTO) परवानगी न घेता आणि कर न भरता ती तोडण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी शकील इब्राहिम शहा व सुलेमान दादामिया शहा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांनी शहरातील सर्व भंगार दुकानदार, व्यावसायिक व गॅरेज मालकांना कडक इशारा व आवाहन केले आहे. भंगार दुकानदारांनी दुकानात येणाऱ्या प्रत्येक जुन्या वाहनाची, त्याच्या इंजिन व चेसिस नंबरची तसेच सुट्या भागांची नोंद अचूक रजिस्टरमध्ये ठेवावी. आरसी बुक, खरेदीखत आणि विक्रेत्याचे आधार कार्ड घेतल्याशिवाय कसलाही व्यवहार करू नये, तसेच RTO च्या अधिकृत परवानगीशिवाय कोणत्याही वाहनाची तोडफोड करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनीही जुनी वाहने खरेदी करताना कागदपत्रांची खात्री करावी आणि परिसरात विनापरवाना किंवा संशयास्पदरीत्या वाहनांची तोडफोड सुरू असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खरे, चेतन लोखंडे, रामचंद्र शिखरे, रोशन निकम, आप्पासाहेब हंडाळ, उमेश चव्हाण, शितल मुगडे व पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे.