Showing 1 of 1
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘संगमनेर फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या दिवशी ‘सजदा’ या सुफियाना संगीत सोहळ्याने रसिकांना संगीताची अनोखी पर्वणी दिली. प्रसिद्ध गायक संदीप पंचवटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरेल रचनांमुळे संपूर्ण वातावरण अध्यात्मिक आणि सुफियाना रंगात न्हाऊन निघाले होते.
गेल्या १८ वर्षांपासून संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या या महोत्सवात संदीप पंचवटकर यांनी आपल्या दिलखुलास सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. ‘सुकून के साथ… करते हैं आगाज’ या भावाने सुरू झालेल्या या मैफलीत एकापाठोपाठ एक सरस फिल्मी आणि गैर-फिल्मी सुफी गीते सादर करण्यात आली. ‘सजदों से जब मेरी जागे…’ यांसारख्या प्रसिद्ध रचनांवर रसिक श्रोते तल्लीन होऊन डोलताना दिसले.
अडीच तास रंगलेल्या या सोहळ्यात मुख्य संयोजक संदीप पंचवटकर यांच्यासह आशिष देशमूख, प्रवीण अय्यर, अमोल यादव आणि गायत्री डुकरे यांनी आपल्या गायकीने रंग भरले. सईद खान यांच्या उत्कृष्ट संगीत संयोजनाने आणि वादकांच्या साथसंगतीने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी फेस्टिव्हलचे प्रणेते उद्योजक मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा आसावा, खजिनदार वेणूगोपाल कलंत्री, दर्शन भंडारी आणि सीए शुभम राठी यांच्या हस्ते कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सुफियाना मैफलीने संगमनेर फेस्टिव्हलची सांस्कृतिक उंची अधिक उंचावली असून, ही संध्याकाळ उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील अशीच ठरली.




Post Views: 85
Showing 1 of 1

