कपाशीच्या पिकात लपवून केलेली गांजाची लागवड उघडकीस आणत पोलिसांनी २ लाख ३२ हजार रुपये मूल्याची ११.६०० किलो वजनाची गांजाची पाच झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत पूर्वी हद्दपार करण्यात आलेला आणि एका गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी किशोर बन्सी जायभाये (वय ३९, रा. येळी, ता. पाथर्डी) याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावच्या शिवारात ही छापामारी केली.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांचा शोध सुरू केला होता. बुधवारी (२३ सप्टेंबर) गस्त घालत असताना पथकाला किशोर जायभाये याने जांभळी शिवारातील कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने पंचांसमक्ष शेताची पाहणी करून ही धडक कारवाई केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख पडताळला असता, तो पाथर्डी पोलिसांच्या एका गुन्ह्यात आधीच फरार होता. तसेच उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी त्याला अहिल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील शिरूर व आष्टी तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. हद्दपारीचा कालावधी सुरू असतानाच आरोपीने जिल्ह्यात घुसून हा बेकायदेशीर प्रकार सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.