महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द परिसरात अत्यंत शांततेत आणि पारंपरिक उत्साहात सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये आश्वी पोलीस ठाण्याने दडपशाही आणि अरेरावी करत मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक गणेश मंडळांनी केला आहे. “गुन्हे दाखल करतो” अशा धमक्या देत कार्यकर्त्यांवर धावून जाणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.
गणेशोत्सवादरम्यान सर्व नियमांचे पालन करून रीतसर परवानग्या घेतलेल्या असतानाही विसर्जन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मंडळे आणि वाद्यवृंदांना नोटिसा बजावल्या. मिरवणुकीदरम्यान वाद्यांच्या तालावर शांततेत नाचणाऱ्या तरुणांवर आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी थेट दमदाटी सुरू केली. “नाचणे आणि वाद्य वाजवणे त्वरित बंद करा, मिरवणुका आटोपत्या घ्या, नाहीतर थेट गुन्हे दाखल करू,” अशी अरेरावीची भाषा वापरल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
कार्यकर्त्यांनी शिरसाठ यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर गावातील उत्सव शांततेत पार पडावा म्हणून कार्यकर्त्यांनी स्वतःहून संयम बाळगला.
दरम्यान, आश्वी खुर्द येथील ‘मोरया हिंदू तरुण मंडळा’ची विसर्जन मिरवणूक नदीकाठी आली असता सपोनि शिरसाठ आणि पोलीस कर्मचारी गोपाळे हे थेट कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. यामुळे नदीकाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता; मात्र सुज्ञ तरुणांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत डॉ. सुजय विखे पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष मोहित गायकवाड यांनी सपोनि शिरसाठ व कर्मचारी गोपाळे यांच्या मनमानी कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलीस स्टेशन सुरक्षेसाठी की दहशतीसाठी?
“आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनदिक्कतपणे सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखवणारे पोलीस शांततेत सण साजरा करणाऱ्या तरुणांवर कसला रोख दाखवत आहेत? आश्वीच्या संपूर्ण इतिहासात आजवर कधीही सामाजिक सलोख्याला धक्का लागलेला नाही. असे असताना दोन्ही गावांना छावणीचे स्वरूप देऊन, तरुणांना ‘बघून घेतो’ अशी दमदाटी करणाऱ्या पोलिसांमुळेच गावाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. या दडपशाहीची सखोल चौकशी झालीच पाहिजे.”
— श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान, आश्वी बुद्रुक.






