कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दरोडा टाकणाऱ्या आणि गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुसक्या आवळल्या आहेत. अंकुश उर्फ अर्जुन नामदेव पवार (वय २९, रा. प्रगती शाळेसमोर, राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, रमीजराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड आणि जालींदर साखरे यांच्या पथकाने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम केली होती.
शोध मोहिमेदरम्यान पोलिसांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कोतवाली आणि राहुरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी अंकुश उर्फ अर्जुन पवार हा देवळाली प्रवरा ते बेलापूर जाणाऱ्या रस्त्यावर संशयितरीत्या उभा आहे. माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला आणि आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता, त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ११०(२), ३११, ३२४ (४) सह आर्म ॲक्ट ४/२५ (गुरनं ९८५/२०२४) आणि राहुरी पोलीस ठाण्यात (गुरनं १०८७/२०२५) बीएनएस कलम ११९ अन्वये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.