– बाळासाहेब घोडके महाराष्ट्र शासनाने २०२६ चा कोरडा दुष्काळ जाहीर केला. बरं झालं. कारण या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण या दुष्काळापेक्षाही मोठे नुकसान काही राजकीय नेत्यांचे, पुढाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण दुष्काळ कोणताही असो, खरे नुकसान यांचेच होते आणि याचा खरा लाभही यांनाच मिळवता येतो.
जाऊ द्या. पण काल-परवा अहिल्यानगरच्या राजकारणात एक आगळी-वेगळी घटना घडली. काही कार्यकर्त्यांसाठी ती सुखद आणि सकारात्मक असेल, तर काहींसाठी नकारात्मक आणि दु:खदही असेल. असणारच. कारण नाण्याला दोन बाजू असतात. आणि जेव्हा त्या दोन्ही बाजू जोडल्या जातात, एकत्र येतात, तेव्हाच ते नाणे चालते, त्याला किंमत मिळते आणि ते चलनात वापरले जाते.
पण हे अचानक कसे झाले? तर यालाही मुख्यमंत्री साहेबच जबाबदार आहेत. त्यांनी दुष्काळ काय जाहीर केला आणि सगळेच चित्र बदलले. काल-परवा घडलेली घटना अशी – माजी खासदार सुजय विखे यांनी राज्याचे माजी मंत्री आणि कट्टर विरोधक असलेल्या, ज्यांच्या पराभवासाठी सुजय दादांनी आटोकाट प्रयत्न केले आणि निवडणुकीत पराभवही केला, अशा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेबांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. कारण काय? तर जिल्हा बँक निवडणूक.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक युती-आघाडीचे नेते थोरात साहेबांच्या भेटीला आले होते. आणि तिथेच आपल्या संस्कृतीचे दर्शन घडले. आपल्या मनाचा मोठेपणा आणि आपली सभ्यता याचे दर्शन सुजय दादांनी दाखवले. चला, कधीतरी समजले की ‘टायगर अभी जिंदा है और वो भी जिंदादिल है’. बरे वाटले. कार्यकर्त्यांचे काय?-
पण एक गोष्ट नक्कीच खटकली. जेव्हा या सर्व राजकीय नेत्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होते, मग ते अस्तित्व राजकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो, तेव्हा हे सर्व मतभेद विसरून एकत्र येतात. आणि परत ‘जनकल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत’ अशी सुंदर भाषा वापरून आपले गणित सोडवून घेतात.
अशावेळी राजकीय विरोधक म्हणून जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात रात्रंदिवस काम करत असतात, त्यांना वाऱ्यावर सोडून, त्यांच्या भवितव्याची कुठलीही काळजी न करता हे नेते आपले हितसंबंध जपतात आणि सत्तेची गणिते जुळवतात. यात यांचा काय दोष म्हणा, याला जबाबदार हा सर्वसामान्य माणूस आणि यांचे कार्यकर्तेच आहेत. बँक कुणाची? आणि रेल्वे कुठे?
हा सुखद धक्का पचवत असताना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा एक प्रश्न आहे. जिल्हा बँकेत जे संचालक मंडळ आहे, ते सर्व राजकीय पुढारी-नेते आहेत. सभासद हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत निवडणुका नकोत, बिनविरोध व्हाव्यात हा बँकेच्या हितासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न अभिमानास्पद आहे, त्याचे स्वागतच केले पाहिजे.
पण जनतेच्या भल्यासाठी हे सर्व विरोधक एकत्र येत असतील, तर मग सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी, हितासाठी का एकत्र येऊ शकत नाहीत?
आता नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग कुणी पळवला आणि कशासाठी? हे राजकारण कशासाठी? आणि जर यामध्ये कुणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात नाही, संबंध नाही, तर मग असेच या प्रश्नासाठी, या जनहितासाठी का एकत्र येऊन केंद्रीय रेल्वे मंत्री किंवा केंद्र शासनाला हा रेल्वे मार्ग पूर्वी ज्या पद्धतीने मंजूर होता, तसाच ठेवा असे ठणकावून का सांगू शकत नाही?
आम्हा संगमनेरकरांची मागणी आहे की, आदरणीय सुजय दादा विखे यांनी ज्या पद्धतीने जिल्हा बँकेसाठी अगदी प्रेमळपणे एकत्र येऊन मोठ्या मनाचा परिचय दिला, तसेच संगमनेरच्या रेल्वेसाठी देखील सर्वांनी एकत्र यावे. ज्याने कोणी रेल्वे पळवण्याचे काम केले, त्याला योग्य उत्तर द्यावे. पुढील काळात राजकारण राजकारणाच्या जागेवर, पण संगमनेरच्या किंवा अहिल्यानगरच्या विकासासाठी असेच एकत्र येऊन विकास करावा. कार्यकर्त्यांसाठी बोध-
कार्यकर्त्यांनी मात्र झेंडा हातात घेताना मनाशी एक खूणगाठ बांधावी आणि आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो व कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो. तडजोड करण्याचे स्कील असेल तरच राजकारणात टिकाल. धर्मनिष्ठा, विचार, श्रम, चळवळ हे सर्व पुस्तकी आणि ऐकीव, तसेच दुसऱ्यांनी पालन करण्याच्या कल्पना असतात.
जनकल्याणासाठी सर्वांनी एकत्र यावे, हीच सर्व जनतेची सर्व राजकारण्यांना आणि राज्यकर्त्यांना कळकळीची विनंती.
जय महाराष्ट्र (सूचना – सदर लेख हा लेखकाच्या वैयक्तिक मतांचा असून, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने या सकारात्मक एकीचे दर्शन विकासकामातही घडवावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.)