महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना अलीकडील अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत थोरात आणि त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुजय विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले. सुजय विखे यांनी थोरातांना वाकून नमस्कार केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “पराभूत होऊनही बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही?” हा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून विचारला जात असेल, तर त्याचे उत्तर केवळ निवडणुकीच्या निकालात शोधता येणार नाही, असे मत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी व्यक्त केले. सहकारातील मुरब्बी नेतृत्व ही थोरातांची खरी ताकद– अहिल्यानगर जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा साखर कारखाने, दूध संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, पतसंस्था आणि इतर सहकारी संस्थांचे मोठे केंद्र आहे. या सहकार क्षेत्राशी बाळासाहेब थोरात यांचा दीर्घकाळाचा संबंध असून, ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी त्यांचा थेट संपर्क हे त्यांच्या राजकीय प्रभावाचे महत्त्वाचे कारण असल्याचे शेलकर म्हणाले.
स्वर्गीय भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय मारोतराव घुले आणि स्वर्गीय शंकरराव काळे यांच्यासारख्या सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या राजकीय-सामाजिक वारशाची पार्श्वभूमीही थोरातांच्या नेतृत्वामागे आहे. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाशी जोडलेले राजकारण ही त्यांची दीर्घकालीन ताकद राहिली आहे. आठ वेळा आमदार, मंत्रिपदाचा अनुभव आणि प्रशासनातील पकड– बाळासाहेब थोरात यांनी सलग आठ वेळा विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले असून, राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शिक्षण, पाटबंधारे आदी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. एखाद्या सामान्य माणसाची समस्या कुठल्या पातळीवर आणि कोणत्या पद्धतीने मांडायची, याचा प्रदीर्घ अनुभव असलेला नेता म्हणून आजही अनेक सामान्य नागरिक थोरातांकडे आशेने पाहतात. सामान्य कार्यकर्त्याला उभे करण्याची क्षमता– थोरातांच्या राजकारणाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याची त्यांची पद्धत. अनेक सामान्य कुटुंबांतील व्यक्तींना राजकारणात पुढे आणणे, संस्थात्मक नेतृत्वाची संधी देणे आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे, यामुळे त्यांच्याशी जोडलेला राजकीय-सामाजिक वर्ग अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. यामुळेच निवडणुकीतील विजय-पराभवापेक्षा त्यांची संघटनात्मक ताकद आणि जनसंपर्क वेगळ्या पातळीवर मोजावा लागतो, जिल्हा बँकेच्या बैठकीने पुन्हा चर्चेला उधाण– अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर रोजी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले.
या प्रक्रियेत थोरात आणि विखे एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या घटनेकडे केवळ राजकीय समझोता म्हणून न पाहता, सहकार क्षेत्रातील थोरातांच्या दीर्घकालीन प्रभावाचे एक उदाहरण म्हणून पाहिले पाहिजे. पराभव झाला, पण राजकीय अस्तित्व संपले नाही– २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र एका निवडणुकीतील पराभवाचा अर्थ एखाद्या नेत्याचे दशकानुदशके निर्माण झालेले राजकीय आणि सामाजिक अस्तित्व संपले, असा होत नाही.
राजकारणात विजय आणि पराभव येत असतात. मात्र पराभवानंतरही कार्यकर्त्यांचे जाळे, सहकारातील संबंध, सामान्य जनतेशी संपर्क आणि जिल्ह्यातील विविध संस्थांशी असलेला संवाद कायम राहत असेल, तर त्या नेत्याचे राजकीय वजन एका निवडणुकीच्या निकालावरून ठरवता येत नाही. लोकसभा निवडणुकीपासून स्थानिक राजकारणापर्यंत– २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत थोरातांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रभावाबाबत चर्चा झाली. मात्र त्यानंतरही संगमनेर आणि जिल्ह्यातील सहकार व स्थानिक राजकारणात त्यांची सक्रियता कायम राहिल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
संगमनेर नगरपालिकेपासून सहकारी संस्थांपर्यंत आणि आता जिल्हा बँकेच्या राजकारणापर्यंत घडणाऱ्या घटनांमधून थोरातांच्या संघटनात्मक क्षमतेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे ‘थोरातांचे राजकारण संपले’ असे म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्षातील राजकीय-सामाजिक घडामोडींकडे पाहणे गरजेचे आहे.
राजकारणातील वलय हे केवळ सत्तेवर अवलंबून नसते- सत्तेत असणे म्हणजेच राजकीय वजन आणि सत्तेबाहेर असणे म्हणजे राजकीय अस्तित्व संपणे, हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा चुकीचे ठरले आहे. बाळासाहेब थोरातांच्या बाबतीतही त्यांच्या मते हीच बाब लागू होते. सत्तेत असो वा सत्तेबाहेर, विजयाच्या शिखरावर असो वा पराभवाच्या छायेत— जनतेशी असलेली नाळ, सहकारातील संपर्क, कार्यकर्त्यांचे संघटन आणि दीर्घ राजकीय अनुभव या चार गोष्टी एखाद्या नेत्याचे वास्तविक राजकीय वजन ठरवतात. बाळासाहेब थोरात यांच्याकडे या चारही गोष्टी आजही आहेत. म्हणूनच पराभवानंतरही त्यांचे राजकीय वलय संपलेले नाही. विरोधकांनीही आता हा प्रश्न विचारण्याऐवजी त्याचे उत्तर जिल्ह्यातील प्रत्यक्ष राजकीय घडामोडींमध्ये शोधावे, असे शेलकर यांनी म्हटले आहे.