संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या काशिफ असद कुरेशी या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
आरोपीकडून कथितरीत्या जप्त करण्यात आलेले ३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज हे व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी म्हणजेच मध्यम स्वरूपाचे असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी ६० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एका सक्षम जामीनदाराच्या हमीवर आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या (NDPS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ सप्टेंबर २०२६ रोजी संगमनेर बसस्थानक परिसरात पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, आरोपीच्या पँटच्या खिशातून आणि दुचाकीच्या ग्लोव्ह बॉक्समधून एकूण १ लाख १७ हजार रुपये किमतीचे ३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील शरीफ पठाण यांनी पोलिसांच्या जप्ती आणि तपासाच्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. जप्त केलेले ड्रग्ज व्यावसायिक प्रमाणात येत नसल्याने या प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम ३७ अंतर्गत असलेले कडक जामीनविषयक निर्बंध लागू होत नाहीत, असा महत्त्वाचा युक्तिवाद बचाव मांडला. तसेच तपासादरम्यान आवश्यक कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नसल्याचे आणि आरोपीचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रे विचारात घेतल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. आरोपी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत होता आणि आता त्याच्याकडून कोणतीही नवीन जप्ती किंवा शोधकार्य बाकी राहिलेले नाही. तपास अधिकारी आणि पोलिसांनी आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत. तसेच ३९ ग्रॅम एमडी हे मध्यम प्रमाणात मोडत असल्याने आणि आरोपीची तपासाला सहकार्य करण्याची तयारी असल्याने त्याला पुढील काळात कोठडीत ठेवणे अनावश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीवर काही अटी लादल्या आहेत. आरोपीने पुराव्यांशी अथवा साक्षीदारांशी कोणतीही छेडछाड करू नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. याशिवाय, प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपीला प्रत्येक रविवारी सकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आणि तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे.