महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. शफिक चौघुले असे आरोपीचे नाव असून, त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ नुसार तीन महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड, तर कलम ५०६ नुसार एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, ३० सप्टेंबर २०१८ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक गंगाधर भागा वाळुंज हे एमएच १७ एजी २०१६ क्रमांकाचा उसाने भरलेला ट्रक कवठे मलकापूर येथील युटेक शुगर फॅक्टरीमध्ये घेऊन जात असताना साकूर परिसरात ट्रक व पिकअप वाहनाच्या चालकांमध्ये वाद झाला.
या वादातून पिकअप चालक शफिक चौघुले याने फिर्यादीला मारहाण केल्याचा आरोप होता. फिर्यादीच्या डाव्या कानाजवळ आणि तोंडावर गंभीर दुखापत केल्याचे तसेच पिकअपमध्ये बसवून नदीमध्ये फेकून देण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी कामकाज पाहिले. खटल्यादरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे तसेच सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या तपासात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अन्सार ईनामदार यांनी काम पाहिले. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी या प्रकरणी सरकारी वकील मच्छिंद्र गवते आणि पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे यांचे अभिनंदन केले आहे. या खटल्याच्या न्यायालयीन निकालामुळे रस्त्यावरील किरकोळ वादातून होणारी मारहाण आणि धमक्यांच्या घटनांमध्ये न्यायालय गंभीरपणे पाहत असल्याचे व कायदेशीर कारवाईचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.