महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेताना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन, आता रेशन वितरणाच्या वेळी दिव्यांगांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिव्यांग सारथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार खताळ पाटील यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत संगमनेर तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांबाहेर दिव्यांगांना रेशन घेताना प्राधान्य देण्याबाबतचे फलक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन घेताना दुकानांमध्ये रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांना अतिरिक्त शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी दिव्यांग सारथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मागणी अत्यंत महत्त्वाची ठरली असून आमदारांच्या या निर्देशामुळे दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्येची तात्काळ दखल घेतल्याने दिव्यांग सारथी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना रेशन घेताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना सध्या मिळणारी अडीच हजार रुपयांची रक्कम प्रतिमहिना सहा हजार रुपये करण्यात यावी, तसेच दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संगमनेरमध्ये दिव्यांग भवन तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.