महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे, तर निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन रविवार, दि. १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. पाण्याचा अपव्यय टाळून अतिशय संवेदनशीलपणे या आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विखे पाटील यांची भेट घेऊन नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई विचारात घेऊन तातडीने आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी आज लोणी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भंडारदरा आणि निळवंडे धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. सद्यस्थितीत पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता तात्काळ आवर्तनाचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले.
भंडारदरा धरणातून बिगरसिंचन आवर्तन रविवार, दि. १५ नोव्हेंबरपासून भंडारदरा धरणातून सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांसह श्रीरामपूर शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, इतर तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांनाही याचा लाभ होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.
निळवंडे धरणातून सिंचन धरणातूनही दि. १५ नोव्हेंबरपासून सिंचनाचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या पाण्याचा लाभ डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कार्यक्षेत्रातील पिकांना होणार असून, संबंधित गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाईही काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
दोन्ही धरणांतून सुटणाऱ्या या आवर्तनाचे नियोजन करताना पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही, याची विशेष दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.