उपअधीक्षकांच्या पथकाला अवघ्या दिड दिवसांत यश
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अल्पवयीन मुलीला धाक दाखवत तिचे अपहरण करुन तिला घेवून तीन दिवस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यास पोलीस उपअधीक्षकांचे पथक यशस्वी ठरले आहे. अवघ्या दीड दिवसात पथकाने जिल्ह्याच्या श्रीगोंद्यात ही यशस्वी कामगिरी केली आहे. घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याची उकल करण्यास स्थानिक पोलीस अयशस्वी ठरले असतांना उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात मिळाली आहे.

साकुर येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिला आरोपी अमोल बापू खेमनर याने पंधरा दिवसांपूर्वी पळवून नेत पून्हा घरी आणून सोडले होते. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलीच तंबी दिली होती. मात्र याचा काहिही परिणाम त्याच्यावर झाला नाही. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आरोपी अमोल खेमनर याच्यासह सिंधुबाई बापू खेमनर, बापू रंभा खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे आणि पोपट खेमनर संबधित अल्पवयीन मुलीच्या घरी ब्रीझा गाडीमधून आले. त्यांनी मुलीचे आजोबा कुशाबा खेमनर आणि आजी ठकाबाई खेमनर यांना मारहाण करत ‘आमच्या नादाला लागलात तर एकेकाला संपवून टाकू’ अशी धमकी देत मुलीस पळवून नेले.

संबधित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी विविध कलमाद्वारे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना तपासाचे आदेश दिले होते. मदने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपासाची सूत्रे फिरवत तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी मुलीला घेऊन श्रीगोंदा, दौड, पाटस, बारामती, भिगवण या भागात असल्याची माहिती मिळविली. सायबर सेलचे फुरखान शेख, पोलीस कर्मचारी अण्णासाहेब दातीर, अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, संतोष खैरे, गणेश लोंढे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, नामदेव बिरे यांच्या पथकाने संबधित परिसर पिंजून काढत तब्बल दीड दिवसांच्या तपासानंतर आरोपीला पाठलाग करुन मुलीसह ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मारुती ब्रीझा कार आणि होंडा मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. सदर कारवाई करीता श्रीगोंदा पोलीस स्टेशन, बेलवंडी पोलीस स्टेशन, अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेसह नगर तालुका पोलीसांची पथकाला मदत झाली.

घारगांव पोलिसांनी आरोपी अमोल खेमनर याच्यासह सिंधुबाई बापू खेमनर, बापू रंभा खेमनर, मंगेश धोंडीभाऊ शेंडगे यांना अटक केली असून संदेश चिल्लापा खेमनर हा अद्यापही फरार असल्याची माहिती देण्यात आली.

