महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
२ ऑक्टोंबरच्या महात्मा गांधी जयंती दिनी पहाटेच पोलिसांनी संगमनेर शहरातील प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जुगाऱ्यांना तब्बल साडेपाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह पकडले आहे. जुगार अड्ड्यावर छाप्यासाठी थेट घारगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील संगमनेरात आले होते. त्यामुळे पोलिस वर्तुळात या छाप्याची चर्चा रंगली आहे.

संगमनेर शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या जोमात सुरु असून यावर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासन अयशस्वी ठरले आहे. शहर पोलिसांनी याच आठवड्यात शहरातील कॉफी सेंटर, कॅफे सेंटरवर छापे मारुन तब्बल ३४ जोडप्यांना अश्लील चाळे करतांना पकडले होते. या घटनेमुळे शहरात अशा प्रकारचे अनैतिक व्यवसायही राजरोसपणे सुरु असल्याचे समोर आले होते.

निरीक्षक सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाशिक-पुणे मार्गावरील हॉटेल लकी शेजारील एका भव्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील अलिशान जुगार अड्ड्यावर गांधी जयंतीच्या दिवशी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. यामुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली होती. पोलिसांनी ११ जुगाऱ्यांसह घटनास्थळावरुन सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १ लाख २१ हजार ५०० रुपये रोख, ३ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, व चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक यमना नामदेव जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करत त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.
नव्या निरीक्षकांचा प्रभाव पडेना
शहर पोलीस ठाण्यात वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच तडकाफडकी बदली नगरच्या मुख्यालयात केल्यानंतर सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांनादेखील संगमनेरात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर घारगांव पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली झालेली ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

